गुरुकुल महाविद्यालय: छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा 2024
गुरुकुल शिक्षण आणि संशोधन संस्था संचलित गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे सोमवार, दि. १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून आपल्या सर्वांसाठी उर्जास्त्रोत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येकांनी योगदान द्यावे ही प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. ‘गुरुकुल शैक्षणिक संस्थे’द्वारे खेर्डी एम.आय.डी.सी. मधील भव्य व प्रशस्त शैक्षणिक दालनात या शिवजयंती कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले गेले.
सर्व प्रथम ‘जय भवानी, जय शिवाजी’ जल्लोषाने संपूर्ण शरीरात चैतन्य निर्माण करून रोहित, कोमल या महाविद्यालय प्रतिनिधी आणि सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी जवळपास २०० मीटर ची मिरवणूक काढली. यामध्ये शिवाजी महाराज – साहिल पवार, जिजामाता – दिव्या महाडिक, सईबाई – रिया जाधव यांनी सहभाग घेतला. सोबत वैदेही, आम्रपाली, सानिका, सेजल, भाग्यश्री. .. आदी ३० विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने रंगत वाढवली. हिंदवी स्वराज्याचे निशाण घेऊन यश, मयूर आणि सहकारी विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत ढोल, ताशा यांचे तालबद्ध वादनाने उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणुक आनंददायी केली. महाविद्यालय परिसरात मिरवणुकीचे सुवासिनींनी यथोचित स्वागत केले. तद्नंतर सभागृहात आल्यावर सर्वजण स्थानापन्न झाले.
गुरुकुल शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा, संस्थापक अध्यक्ष श्री. संजय दरेकर सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. गुरुकुल महाविद्यालयाच्या सेंटर हेड सौ. मनोरमा दरेकर मॅडम, कार्यालयीन विभाग प्रमुख श्री. साखरे सर यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. मान्यवरांचे शुभहस्ते दीप-प्रज्वलन आणि श्री सरस्वती–देवी पूजन केले गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले. उपस्थितांचे यथोचित स्वागत करण्यात आले. शिवरायांची आरती, महाराष्ट्रगीत, स्वा. सावरकरांचे ‘प्रभो शिवाजी राजा’ हे गीत गाईले गेले. त्यानंतर शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांची धर्मनिरपेक्षता, शिकवण, व्यवहारचातुर्य, राज्याभिषेक, राज्यारोहण आदी विविधांगी पैलूंवर श्रुती, पूजा, कल्याणी, ओंकार, आशिष, सर्वेश यांनी आपले विचार मांडले. धनेश, सुशांत, तीर्थराज, साईनाथ, ऋषिकेश यांनी आवेशपूर्ण पोवाडा सादर केला. प्रीती, दीक्षा, श्वेता, सिद्धी, कल्याणी, दिव्या यांनी शिवाजी महाराजांची काही गीते सादर केली. या कार्यक्रमाचे रसपूर्ण निवेदन कोमल साळुंखे हिने केले. काही विद्यार्थी – विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी शिवरायांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
सन्माननीय श्री. दरेकर सर यांनी शिवाजी महाराजांना वंदन करून उपस्थितांना ‘शिवजयंती’च्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती हे ओघवत्या शैलीत मांडले. “छत्रपती शिवाजी महाराज स्वत:साठी नाही तर समाजासाठी जगले. त्यांनी राजमहाल बांधला नाही, तर अभेद्य गडकिल्ले बांधले. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींचा विचार केला. शिवजयंती केवळ एक दिवस नाही तर या शुभदिनी उर्जा घ्यायची आणि उर्वरित ३६४ दिवस रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणण्याचा संकल्प करूयात. आपण सर्वांसाठी ‘गुरुकुल शैक्षणिक संस्थे’द्वारे एका छताखाली सर्व शैक्षणिक सुविधा अत्यल्प खर्चात उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार अद्ययावत, प्रोफेशनल, कौशल्यपूर्ण व संगणकीय शिक्षण देत आहोत. उत्तुंग ध्येयासक्ती व मेहनतीने प्रत्येकाने आपली सर्वांगीण प्रगती साधावी अशी मनोकामना व्यक्त केली. पुनश्च ‘शिवजयंती’ च्या शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक विभागाने प्राचार्या डॉ. सौ. पूनम शित्याळकर मॅडम, वरिष्ठ प्राध्यापक श्री. आशिष चव्हाण सर आणि श्री. मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाने या ‘शिवजयंती – २०२४’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम अत्यंत आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. धन्यवाद...!