गुरुकुल महाविद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ चंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे……
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो…!
भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शुभहस्ते राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर फ्रान्सचे आदरणीय राष्ट्रपती श्री. इमैनुएल मैक्रो यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वज फडकावून आज २६ जानेवारी, २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे आपणही मोठ्या आनंदाने हा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या राष्ट्रीय शुभदिनी परेड कमांडर यश चव्हाण याने संकेतानुसार आदरणीय मान्यवरांना त्यांचे शुभहस्ते ध्वज फडकवला जावा हि विनंती केली. प्रमुख अतिथी श्री. संतोष जाधव साहेब यांचे शुभहस्ते ध्वज फडकावला गेला. उपस्थितांनी सलामी दिली. सर्वांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत म्हटले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आदी घोषणांनी भारतीय अस्मिता चेतवण्याचा प्रयत्न झाला. श्री. जय सुर्वे सर यांनी संविधानाच्या ‘प्रास्ताविका’ चे वाचन केले. देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून राष्ट्रभक्ती जागवली गेली. विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. कोमल साळुंखे हिने छोटेखानी भाषण केले.
जवळपास १५० वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक प्रयत्नांनी १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांच्या परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्विकारण्यात आली. २६ जानेवारी १९५० ला ती अंमलात आणली गेली. आज शिक्षक प्रतिनिधी म्हणून मनोगतात बोलतांना श्री. जय सुर्वे सरांनी प्रास्ताविकात दिलेल्या सार्वभौमत्त्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या आठ शब्दांचे महत्त्व विषद करून त्यामधील फक्त सार्वभौमत्त्व बाबतीत आपण पूर्णत्व प्राप्त करू शकलो आहोत; याची जाणीव करून दिली. इतर सात बाबतीत आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करून अखंड भारताला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक करूयात; हा आशावाद व्यक्त करून ७५ व्या गणतंत्र दिनाच्या सर्व उपस्थित राष्ट्रप्रेमी सज्जनांना शुभेच्छा दिल्या.
या दिनाचे औचित्य साधून प्रा. श्री. सुर्वे सर, प्रा. सौ. अंकिता मॅडम, सौ. नाझीश मॅडम, अल्फिया मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्याने महाविद्यालयाद्वारे पोस्टर बनविणे स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन स. ९:०० ते ११:०० वा. या वेळेत विद्यार्थी – विद्यार्थींनी यांचेसाठी केले गेले.
या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पुनम शित्याळकर मॅडम, श्री. भाऊ पवार सर, श्री. साखरे सर, श्री. चव्हाण सर, श्री. मोहिते सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सौ. पिंपुटकर मॅडम, प्रा. श्री. जठार सर, प्रा. तमन्ना मॅडम, प्रा. श्री. निर्मळ सर, प्रा. सौ. प्रज्ञा मॅडम, प्रा. सौ. प्रियांका मॅडम, प्रा. सौ. ज्योती मॅडम, प्रा. नीलम मॅडम आणि सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नेटकं आयोजन केले गेले. या राष्ट्रीय दिनी सर्वांना महाविद्यालयाद्वारे अल्पोपहार देवून आनंदाने समारोप केला गेला.